६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी राज कुंद्राची आर्थिक गुन्हे शाखेकडून ५ तास चौकशी; शिल्पा शेट्टीवरही समन्सची शक्यता
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याच्यावर ६० कोटी ४८ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी (१६ सप्टेंबर) आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल पाच तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान कुंद्रावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्याची बाजू ऐकून घेण्यात आली. त्याने पाच कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची रक्कम वळविल्याची कबुली दिली असून त्यापैकी २५ कोटी रुपये वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचेही समोर आले आहे.
व्यवसायिक दीपक कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०१५ ते २०२३ दरम्यान कुंद्रा दाम्पत्याच्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्ममध्ये त्यांनी ६० कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या कंपनीतील तब्बल ८७.६ टक्के शेअर्स शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या नावावर होते.
एप्रिल २०१५ मध्ये ‘शेअर सबस्क्रिप्शन ॲग्रीमेंट’ अंतर्गत ३१.९ कोटी रुपये गुंतवण्यात आले, त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये ‘सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट’द्वारे आणखी २८.५३ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. मात्र, या रकमेचा वापर व्यवसायासाठी न करता राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांनी वैयक्तिक खर्चांसाठी केल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
चौकशीत उघडकीस आलेले तपशील
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात कुंद्राने गुंतवणुकीतील मोठा हिस्सा खालील कंपन्यांमध्ये वळविल्याचे मान्य केले आहे –
सतयुग गोल्ड
विहान इंडस्ट्रीज
इसेन्सिशअल बल्क कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड
बेस्ट डिल
स्टेटमेंट इंडियायातील २५ कोटी रुपये वैयक्तिक कामांसाठी खर्च केल्याचे पुरावे समोर आले असल्याचे तपासात दिसून आले आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा जबाब अद्याप नोंदवलेला नसला तरी तपासाच्या गरजेनुसार तिलाही समन्स बजावले जाऊ शकते, असे आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचे वारंवार विदेश दौरे लक्षात घेता त्यांच्यावर लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून कंपनीतील आर्थिक व्यवहारांचे बारकाईने परीक्षण करण्यात येत आहे. राज कुंद्राची चौकशी पुढील काही दिवसांत पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.