सत्तेत असूनही प्रशासनाकडून दखल नाही; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिक हतबल
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे आमदार, खासदार आणि शहरात ठाम वर्चस्व असले तरीही स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रशासनाला साकडे घालावे लागणे, इशारे द्यावे लागणे आणि तरीही दखल न घेतली जाणे अशी विचित्र स्थिती कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना वारंवार अल्टीमेट द्यावे लागत असले तरी रस्त्यावरील खड्डे, पाणीपुरवठा यासारख्या ज्वलंत समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे “शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शिवसैनिक हतबल झाले आहेत” अशी चर्चा सध्या शहरभर रंगली आहे. महापालिका हद्दीतील रस्त्यांची दयनीय अवस्था ही नागरिकांसह वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही खड्डेमुक्तीचा दावा कागदावरच राहिला आहे. यंदा तब्बल ३० कोटी रुपये खर्चाचे काम मंजूर असून, जवळपास १३ कंत्राटदारांकडे कामाचे विभाजन झाले आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्ती करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. “वेळीच काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदार व अधिकारी गयेल नाही,” असा दमही भरला होता. मात्र प्रत्यक्षात खड्डे बुजविण्याऐवजी केवळ पाहण्या आणि आदेशांची नाटकबाजी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी प्रशासनाला धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. तरीही स्थिती जैसे थेच राहिली. आता कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख निलेश शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांचे दालन गाठून ताशेरे ओढले. “सात दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत, पाणीपुरवठ्याची समस्या सोडविली नाही, तर आज हात जोडतोय, पण पुढे हात सोडणार,” असा इशारा त्यांनी आयुक्तांना दिला. सत्ताधारी पक्षाचे चार आमदार, खासदार असूनही प्रशासन जुमानत नाही, हा नागरीकांप्रमाणेच शिवसैनिकांसाठीही संतापाचा विषय ठरत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी पक्षच प्रशासनासमोर हतबल झाल्याचे चित्र प्रथमच ठळकपणे दिसून येत आहे. नागरिक प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा सत्ताधारी पक्षालाच जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चर्चा शहरात सुरू आहे.