मुंबई पोलिसांचा ड्रग्ज तस्करांवर मोठा घाव; बोरीवली, मालाड आणि सायन परिसरात ३.५८ कोटींचा एम.डी. जप्त
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – बृहन्मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने राबवलेल्या विशेष मोहिमेतून सलग कारवायांमध्ये तब्बल १ किलो ७३२ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आला आहे. या अंमली पदार्थाची बाजारमूल्ये तब्बल ₹३.५८ कोटी इतकी असून, तिन्ही प्रकरणांत मिळून तीन ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे.
बोरीवली कारवाई
कांदिवली युनिटने ३ सप्टेंबर रोजी बोरीवली पूर्व येथील नॅशनल पार्क परिसरात सापळा रचला. या कारवाईत १.२९७ किलो एम.डी. जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत अंदाजे ₹२.५९ कोटी इतकी आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
मालाड कारवाई
आझाद मैदान युनिटने १३ सप्टेंबर रोजी न्यू म्युनिसीपल मार्केट, मालाड पश्चिम येथे छापा घातला. यावेळी १८४ ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाचे बाजारमूल्य अंदाजे ₹३६.८० लाख असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सायन कारवाई
वरळी युनिटने १३ सप्टेंबर रोजी राणी लक्ष्मी चौक, बी.एस.टी. बस स्टॉप जवळ, सायन पश्चिम येथे धाड टाकली. या कारवाईत २५१ ग्रॅम एम.डी. जप्त झाला असून, त्याची किंमत अंदाजे ₹६२.७५ लाख इतकी आहे. संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.
या तीनही कारवायांमध्ये मिळून एकूण १.७३२ किलो एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त झाला असून, त्याची एकूण किंमत ₹३.५८ कोटी इतकी आहे.
ही यशस्वी मोहीम पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) श्री. नवनाथ ढवळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवायांचे नेतृत्व पो.नि. शशिकांत जगदाळे (कांदिवली युनिट), पो.नि. राजेंद्र दहिफळे (आझाद मैदान युनिट) आणि पो.नि. संतोष साळुंखे (वरळी युनिट) यांनी केले.
बृहन्मुंबई पोलिसांच्या या सलग कारवायांमुळे अंमली पदार्थ विरोधी कक्ष समाजाला ड्रग्जमुक्त करण्यासाठी दृढनिश्चयाने कार्यरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.