शिवतीर्थावर दसऱ्याला पुन्हा एकदा शिवसेनेचाच गजर! मुंबई महापालिकेकडून मेळाव्यासाठी परवानगी
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – शिवतीर्थावरील ऐतिहासिक दसरा मेळावा यावर्षीदेखील दणक्यात पार पडणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक तसेच राज्यभरातील नागरिक २ ऑक्टोबर रोजी शिवतीर्थावर एकत्र जमणार आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून या मेळाव्यासाठी औपचारिक परवानगी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळावा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हा मेळावा केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक, विचारप्रबोधनाचा सोहळा मानला जातो. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच जोशात सुरू असून, यावर्षी देखील उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून शिवसैनिकांना दिशा दाखवणार आहेत.
राज्यातील विविध भागांतून कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होण्याची तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून, येणाऱ्या निवडणुकांचा विचार करता उद्धव ठाकरे कोणता सूर लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई पोलिस व महापालिका प्रशासनाने यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष आराखडा आखण्यात आला असून, शिस्तबद्ध पद्धतीने मेळावा पार पडावा यासाठी शिवसेना पदाधिकारी तयारीत आहेत. शिवतीर्थावरून दसऱ्याला होणारा हा मेळावा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाचे लक्ष वेधून घेणार यात शंका नाही.