पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत नोटा आणि डाॅलरचा पाऊस! खेळण्यातल्या नोटांसाठी भाविकांची झुंबड, सामाजिक कार्यकर्त्यांची नाराजी
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा एक अनोखा आणि गोंधळ उडवणारा प्रकार पाहायला मिळाला. पुण्यातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि मध्यवर्ती पेठांमधून जाणाऱ्या विसर्जन मार्गावर गणेश मंडळांनी ‘पेपर ब्लास्ट’चा वापर करून पाचशे, दोनशे, शंभर, पन्नास, वीस, दहा रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा तसेच डाॅलरची उधळण केली. पाहता क्षणी या नोटा अगदी खरी वाटल्याने भाविकांची झुंबड उडाली. अनेकांनी धाव घेत रस्त्यावर पडलेल्या नोटा उचलण्यास सुरुवात केली.
मात्र, काही वेळाने या नोटा फक्त खेळण्यांसाठी वापरण्यात आलेल्या असल्याचे लक्षात आल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. या प्रकाराला अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी “मनोरंजनाचा भाग” असे म्हटले. परंतु काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त करत, गर्दीत गोंधळ किंवा अपघाताची शक्यता असल्याचे सांगितले.
पोलिसांचे आवाहन –
पुणे पोलिसांनी गणेश मंडळांना अशा प्रकारांना आळा घालण्याचे आवाहन केले आहे. मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमले असताना अशा गोंधळजनक प्रकारांमुळे अनावश्यक भीती आणि धावाधाव होऊ शकते, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला.
पर्यावरणाची हानी –
या नोटांच्या उधळणीमुळे रस्त्यांवर कचऱ्याचा ढीग पडल्याचे दिसून आले. “खेळण्यातल्या नोटांचा योग्य निपटारा करणे आवश्यक आहे. कचऱ्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते,” असे मत पर्यावरण कार्यकर्ते नीलेश कांबळे यांनी व्यक्त केले.
चर्चेला उधाण –
रस्त्यांवर पसरलेल्या नोटांनी विसर्जन पाहण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला. “पुण्यात खरोखर नोटांचा पाऊस पडला का?” अशा चर्चा शहरभर रंगल्या. अनेक नागरिकांनी या प्रकाराला विनोदी दृष्टीने घेतले, तर काहींनी याला धोकादायक व जबाबदारीशून्य कृत्य म्हणून हेटाळणी केली.
यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सजावटीवर भर देण्यात आला होता; पण ‘पेपर ब्लास्ट’चा हा नोटांचा खेळ मात्र शहरात वेगळ्याच चर्चेचा विषय ठरला आहे.