अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला २६/११ हून मोठ्या हल्ल्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवर

Spread the love

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला २६/११ हून मोठ्या हल्ल्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवर

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची गंभीर धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एक अज्ञात मेसेज पाठवण्यात आला असून, त्यामध्ये ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बसवण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. धमकीच्या संदेशात म्हटले आहे की, या बॉम्बस्फोटांमध्ये ४०० किलो आरडीएक्सचा वापर केला जाईल आणि त्यातून सुमारे १ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या धमकीनंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून, संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.धमकीच्या मेसेजमध्ये ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या कथित दहशतवादी संघटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, भारतात १४ पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचाही दावा करण्यात आला असून, हे अतिरेकी मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचे भासवले आहे.

या प्रकाराची पोलीस मुख्यालय, अँटी टेरर स्क्वॉड (एटीएस), सायबर सेल आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. सध्या हा मेसेज नेमका कोणी केला याबाबत पोलिसांचा तपास सुरू असून, संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी, गणपती विसर्जन मार्गांवर, रेल्वे स्थानकांवर आणि मॉल्समध्ये पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाल किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ १०० किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon