मिरारोडमध्ये अभिनेत्रीच्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; मालिकांमधील अभिनेत्री रंगेहात सापडली!
योगेश पांडे / वार्ताहर
मीरा रोड – सिनेसृष्टीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या जवळील काशीमिरा पोलीस ठाण्याहद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यात ४१ वर्षीय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास हिला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दोन टेलिव्हिजन मालिकांमधील तसेच बंगाली सिनेमातील महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन बनावट ग्राहक तयार केले. आरोपींनी ग्राहकांना मुंबई–अहमदाबाद महामार्गालगतच्या काशीमिरा येथील एका मॉलमध्ये बोलावले होते. पोलिसांनी रंगेहात सापळा रचत आरोपींना पैसे स्वीकारताना पकडले आणि त्यांना ताब्यात घेतले.
अटकेत आलेली अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास (४१) असं नाव आहे. तर पोलिसांनी सुटका केलेल्या दोन महिला कलाकार, ज्यांनी टीव्ही मालिकांमध्ये तसेच बंगाली चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यांना ताब्यात घेऊन आश्रयगृहात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३७०(३) (मानव तस्करीसंबंधी) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (पिटा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, रॅकेटमागील इतर व्यक्ती, दलाल आणि नेटवर्कबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, “हे रॅकेट उच्चभ्रू समाजातील ग्राहकांसाठी चालवले जात होते. आरोपी अभिनेत्री मध्यस्थाची भूमिका बजावत होती. तिला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.” ही घटना मनोरंजन विश्वाला धक्का देणारी आहे. कारण वेश्याव्यवसायासारख्या घृणास्पद कृत्यात एका अभिनेत्रीचा सहभाग उघड झाल्याने सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांचा तपास वाढवला गेला असून या रॅकेटचे इतर धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.