कर्जाच्या आमिषाने डोंबिवलीतील महिलेची ९३ लाख रुपयांची फसवणूक; ऐरोलीतील इसमावर गुन्हा दाखल

Spread the love

कर्जाच्या आमिषाने डोंबिवलीतील महिलेची ९३ लाख रुपयांची फसवणूक; ऐरोलीतील इसमावर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली : व्यवसायासाठी आर्थिक मदत करतो, तुमच्या नावावर कर्ज काढतो आणि हप्ते मीच फेडतो असे आमिष दाखवून नवी मुंबईतील ऐरोली येथील एका इसमाने डोंबिवलीतील एका नोकरदार महिलेची तब्बल ९३ लाख ६० हजार ४४९ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कसे घडले प्रकरण?

तक्रारदार महिला डोंबिवली पश्चिमेतील अंबिका नगर, न्यु कस्तुरी सोसायटीत राहतात. त्या नोकरदार असून, आरोपी इसम योगेश सुधाकर नाईक (रा. ऐरोली, साईनाथ वाडी, रखमाजी प्लाझा, सेक्टर क्र. १, नवी मुंबई) याने त्यांचा विश्वास संपादन केला.

“मी सरकारी नोकरी करतो. मला पैशांची गरज आहे. तुमच्या नावावर कर्ज काढून द्या, ते मी नियमित वेळेत फेडेन,” असे आश्वासन त्याने महिलेसी दिले.

त्यानुसार महिलेकडून बँक खाते, पॅन, आधारकार्ड, वेतनचिठ्ठी यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन आरोपीने वित्तीय संस्थेत सादर केली.

या कागदपत्रांच्या आधारे महिलेला कर्ज मंजूर झाले आणि रक्कम तिच्या बँक खात्यावर जमा झाली.

महिलेचा विश्वास संपादन करून आरोपीने ही संपूर्ण रक्कम स्वतःच्या खात्यात वळती करून घेतली.

सुरुवातीला हप्ते भरले, नंतर टाळाटाळ

आरोपीने फसवणुकीचा आडोसा करण्यासाठी १२ लाख १६ हजार ८९९ रुपयांचे कर्ज हप्ते भरले.

मात्र त्यानंतर त्याने कर्जाचे हप्ते भरणे टाळले.

कर्ज थकू लागल्यावर वित्तीय संस्थेकडून महिलेला वारंवार विचारणा होऊ लागली.

महिलेने आरोपीला हप्ते भरण्यास सांगितले असता, त्याने टाळाटाळ करून शेवटी ८१ लाख ४३ हजार ५५० रुपयांची थकबाकी न भरता पसार झाला.

पोलिसांत गुन्हा दाखल

या फसवणुकीबाबत महिलेने डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस गुन्ह्याचा तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. ही फसवणूक ८ एप्रिल २०२२ ते १६ एप्रिल २०२२ या कालावधीत घडली असून घटनास्थळ डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील वाशी बसथांब्याजवळील मंगल सोसायटी परिसर असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon