नाल्यात सापडले महिलेचे मुंडके; खुनाचे रहस्य पोलीस उलगडणार
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – एक धक्कादायक घटना ऐन गणेशोत्सवात समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात एका नाल्यात एका महिलेचे कापलेले मुंडके सापडले आहे. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, भिवंडी परिसरातील ईदगाह रोडवरील एका कत्तलखान्याजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका वाटसरूला नाल्यात एका अज्ञात महिलेचे कापलेले मुंडके दिसले. महिलेचे वय २५ ते ३० वर्षांदरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. भिवंडी पोलीस नियंत्रण कक्षातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुंडके तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले.हत्या आणि पुरावा नष्ट करणे या अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असेही पोलिसांनी सांगितले. या हत्येनं एकच खळबळ उडाली आहे. शिवाय ही महिला कोण याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
याबाबत वरिष्ट पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की आम्हाला स्थानिकांनी माहिती दिली. त्यानंतर आम्ही महिलेचे मुंडके वैद्यकीय तपासणीसाठी भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. शरीरापासून मुंडके वेगळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने, प्राथमिक तपासात हे खुनाचे प्रकरण असल्याचे दिसून येते. आतापर्यंत, आम्ही अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. लवकरच या खूनाचा आम्ही तपास लावू असं ही त्यांनी सांगितलं.