सातारा पोलिसांकडून महाराज असल्याचं सोंग करणाऱ्या तोतयाच्या गांजाच्या शेतीचे रॅकेट उघड; एकाला अटक तर महाराज फरार
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – महाराज असल्याचे सोंग करत एकाने चक्क गांजाची शेती केली. महाराजांच्या शेतातून जिल्ह्यात विविध भागात गांजाची विक्री सुरू आहे. सातारा पोलिसांना याची कुणकुण लागताच पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश करत तीन गोण्या गांजा जप्त केला आहे. यातील एकाला अटक केली आहे तर महाराज पसार झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. परमेश्वरानंद उर्फ गोट्या महाराज दहीहंडी असे संशयित व्यक्तीचं नाव आहे. तर लहू बंडूबा मोरे वय २५ राहणार सिंदोर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा गावात दुचाकी वर एक तरुण गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले, निर्मला राग, दीपक बचाटे, नंदकुमार भंडारे, अमलदार सुनील बेलकर, दीपक शिंदे, जगदीश खंडाळकर यांच्यासह पथक तैनात करण्यात आलं.
साताऱ्यातील होळकर चौक ते सातारा गाव रस्त्यावर सापळा रचण्यात आला. संशयित व्यक्ती घटनास्थळी आला पोलिसांनी त्याच्याकडून ३८५ ग्राम गांजा पकडला. पोलीस ठाण्यात नेऊन त्याला पाहुणचार दिला. त्यानंतर त्याने गेवराई बुद्रुक येथील डोंगरावर गांजाची शेती असल्याचे सांगितलं. ही शेती परमेश्वरानंद यांची असून तोच गांजा पुरवतो अशी कबुली त्याने दिली. सातारा पोलीस गेवराई येथील डोंगरावर पोहोचले असता जनावरांच्या गोठ्यात तीन गुन्ह्यांमध्ये ३० किलो गांजा आढळून आला. डोंगर परिसरामध्ये परमेश्वरानंद महाराज सापडला नाही. पोलीस जाण्यापूर्वीच तो पसार झाला. परमेश्वरानंद महाराज हा जनावरांना पाळून सेंद्रिय खताची निर्मिती करतो. त्याची विक्री देखील करतो. यासोबत तो राहत असलेल्या डोंगर परिसरामध्ये गांजाचे पीक घेऊन विक्री करतो.