मुंब्रा येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कामगिरी; २ कोटी ३८ लाखांचा हायब्रीड गांजा व एमडीएमए जप्त

Spread the love

मुंब्रा येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कामगिरी; २ कोटी ३८ लाखांचा हायब्रीड गांजा व एमडीएमए जप्त

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे : अंमली पदार्थ विक्रीविरोधात ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २,३८,८७,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये २ किलो ३७४ ग्रॅम वजनाचा हायब्रीड गांजा (विड्स) किंमत २,३७,४०,००० रुपये तसेच १९ एमडीएमए /परमानंद टॅबलेट्स किंमत १,४७,००० रुपये असा एकूण अंमली पदार्थाचा समावेश आहे. ठाणे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले तसेच पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. अमरसिंह जाधव यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखाली पथकाने २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री मुंब्रा येथील सिम्बॉयोसिस शाळेसमोर, जुना टोलनाका परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.

या वेळी आरोपी सुमित राजुराम कुमावत (वय २१, रा. बोरिवली, मूळ रा. जैसलमेर, राजस्थान) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून विक्रीसाठी ठेवलेला गांजा व एमडीएम टॅबलेट्स जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्र. १४०८/२०२५ भा. दं. सं. एन.डी.पी.एस. कायद्यान्वये दाखल करण्यात आला असून तो ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत आहे. पुढील तपास पोउपनि राजेंद्र निकम हे करीत आहेत. प्राथमिक चौकशीत सदर अंमली पदार्थ परदेशातून भारतात तस्करीद्वारे आणण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या मागे आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याचे संकेत मिळत आहेत.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकातील सपोनि निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर पाटील, पोउपनि राजेंद्र निकम, दिपक डुम्मलवाड, पोहवा शिवाजी रावते, हरीष तावडे, संदीप चव्हाण, अभिजीत मोरे, अमोल पवार, अमोल देसाई, हुसेन तडवी, अजय सपकाळ, अमित सपकाळ, नंदकिशोर सोनगिरे, गिरीष पाटील, पोशि आबाजी चव्हाण, चापोना अनुप राक्षे, मपोहवा शिल्पा कसबे व मपोशि कोमल लादे यांनी केली.

पोलीसांचे आवाहन :

अंमली पदार्थ विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवन करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींबाबत नागरिकांनी माहिती उपलब्ध करून द्यावी. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील, असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon