केडीएमसी आयुक्त भाजपचा प्रचार करतात? ‘वंचित’चा सवाल; आयुक्तांना दिले कमळाचे फूल

Spread the love

केडीएमसी आयुक्त भाजपचा प्रचार करतात? ‘वंचित’चा सवाल; आयुक्तांना दिले कमळाचे फूल

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल हे महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून भारतीय जनता पक्षाचा प्रचार करत आहेत का, असा गंभीर प्रश्न वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेने उपस्थित केला आहे. या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी आयुक्तांची भेट घेतली. त्यांना ‘कमळाचे’ फूल देऊन महापालिकेच्या या कथित प्रचाराचा निषेध केला. केडीएमसी महापालिकेच्या सोशल मीडिया टीमकडून त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आवाहनासाठी कल्याण पूर्वेच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड यांचा व्हिडिओ वापरण्यात आला. व्हिडिओमध्ये आमदार गायकवाड यांनी कमळाचे चिन्ह असलेले मफलर परिधान केले होते, ज्यामुळे हा व्हिडिओ राजकीय प्रचाराचा भाग वाटत होता, असा आरोप आहे.

या व्हिडिओवर वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कमलेश उबाळे यांच्यासह रोहित डोळस, राजू खरात आणि नितीन कांबळे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. महापालिकेचे सोशल मीडिया अकाउंट्स कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी वापरले जाऊ नयेत, अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणी, उबाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन त्यांना ‘कमळाचे’ फूल दिले आणि हा प्रकार त्वरित थांबवण्याची मागणी केली. आयुक्तांनी या शिष्टमंडळाला लेखी स्वरूपात तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, कमलेश उबाळे यांनी तात्काळ लेखी तक्रार आयुक्तांना सादर केली आहे. महापालिकेच्या अधिकृत माध्यमांचा वापर राजकीय प्रचारासाठी होत असल्याच्या या आरोपांमुळे केडीएमसी मध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon