सात महिन्यांपासून फरार असलेल्या हायप्रोफाइल आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सातारा जिल्ह्यातून घेतले ताब्यात

Spread the love

सात महिन्यांपासून फरार असलेल्या हायप्रोफाइल आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सातारा जिल्ह्यातून घेतले ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर

लोणावळा – लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत सात महिन्यांपासून फरार असलेल्या एका हायप्रोफाइल आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. आकाश अजिनाथ साळुंखे (२८) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत भावेश पटेल यांनी जानेवारी महिन्यात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीविरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भावेश पटेल यांनी वाकसई गावच्या हद्दीत वरसोली टोलनाक्याजवळ सिल्व्हर स्टोन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने ५२ बंगले बांधण्याचा प्रकल्प राबवला होता. कामात नुकसान झाल्यामुळे ते गुंतवणूकदार शोधत होते. यादरम्यान त्यांची ओळख आकाश साळुंखे यांच्याशी झाली. त्याने स्वतःला एटीएस अधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे भासवले व पटेल यांचा विश्वास संपादित करून त्यांना ४२ कोटी रुपये देण्याचा विश्वास दाखवला. त्यांनी कंपनीचे ८० टक्के शेअर आकाश यांच्या नावावर केले आणि त्याऐवजी आकाशने पटेल यांना ४२ कोटी रुपयांचे आठ धनादेश दिले. मात्र, नोंदणी झाल्यानंतर आकाशने धनादेशांचे पेमेंट थांबवले.

नोंदणी केलेले दस्तऐवज पटेल यांच्या कार्यालयात होते. परंतु, आकाशने ते लंपास केले. त्यानंतर त्याने वाकसई तलाठी कार्यालयात बंगला व मालमत्तेची नोंद स्वतःच्या नावावर करण्यासाठी प्रकरण दिले. तलाठी कार्यालयातून नोटिसा जाताच पटेल यांना फसवणुकीची जाणीव झाली आणि त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर आकाशने दस्तऐवज रद्द करण्यासाठी पटेल यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली. तेव्हापासून तो पोलिसांना चकवा देत फरार होता. मागील सात महिन्यांपासून पोलिस त्याचा पाठलाग करत होते. सातारा जिल्ह्यात त्याचा ठिकाणा समजल्यावर २१ ऑगस्ट रोजी लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे, पोलिस कॉन्स्टेबल सतीश कुदळे, पोलिस हवालदार विजय गाले आणि प्रवीण गेंगजे यांच्या पथकाने सापळा रचून आकाश साळुंखे याला ताब्यात घेत अटक केली. तपासात आकाशने वेगवेगळ्या स्टिकर लावलेल्या गाड्या चालवल्या होत्या. ज्यावर पोलिस तसेच आमदारांचे स्टिकर होते. त्याच्यावर सातारा आणि इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon