देवनारमध्ये पोलिसांवर चाकू हल्ला; दोन पोलीस जखमी, पाच आरोपी ताब्यात

Spread the love

देवनारमध्ये पोलिसांवर चाकू हल्ला; दोन पोलीस जखमी, पाच आरोपी ताब्यात

रवि निषाद / मुंबई

मुंबई : देवनार पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांवर शनिवारी उशिरा रात्री अंटलाटा गार्डन मैदान परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईदरम्यान चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पोलीस हवालदार भालेराव (बकल नं. ९९०५६८) आणि पोलीस शिपाई सूर्यवंशी (बकल नं. १५१०८९) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पीटर ऑपरेटर पोलीस शिपाई आंधळे (बकल नं. १११४५७) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १०.४५ वाजता डिटेक्शन स्टाफचे हवालदार भालेराव व शिपाई सूर्यवंशी गस्त घालत असताना अंटलाटा गार्डन मैदान परिसरात एनडीपीएस कारवाईसाठी गेले होते. त्या वेळी मैदानात गांजा पित बसलेल्या ४ ते ५ इसमांनी अचानक पोलिसांवर हल्ला केला. हवालदार भालेराव यांच्या छाती-पोटाच्या मध्ये चाकूने वार करण्यात आला, तर शिपाई सूर्यवंशी यांच्या कानावर वार करण्यात आला.

जखमी पोलिसांना तातडीने ग्लांजी हॉस्पिटल, देवनार येथे दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सुराणा हॉस्पिटल, चेंबूर येथे हलविण्यात आले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ४९२/२०२५ अंतर्गत क.१०९(१), १८२(२), १९०, १९१(२), १९१(३), ११५(२), ११८(१), १३२ बीएनएस तसेच क.८(क), २७ एनडीपीएस कायद्यान्वये दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

घटनास्थळी परिमंडल ६ चे माननीय पोलीस उपायुक्त समीर शेख, सहायक पोलीस आयुक्त देवनार विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवनार यांनी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. तसेच ईस्ट-वेस्ट नाईट राउंड सर व अबले नाईट राउंड अधिकारी यांनीही घटनास्थळाला भेट दिली. देवनारमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon