शहापूरमध्ये फार्महाऊसवर वृद्ध महिलेची हत्या; पाच दिवसांत पोलिसांकडून घटनेचा उलगडा, आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे – वार्ताहर
ठाणे – शहापूर तालुक्यातील एका फार्महाऊमध्ये एका ज्येष्ठ महिलेची हत्या केल्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने चोरी करत अन्य एका ज्येष्ठ महिलेवर जिवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत तरुणाला अटक केली आहे. कपड्याचे दुकान चालवणारा हा तरुण कर्जबाजारी झाला होता. त्याला दुकानात कपडे खरेदी करायचे होते. त्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याची बाब चौकशीत समोर आल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ठाण्यातील घोडबंदर भागातील पातलीपाडा येथे राहणारे नरेश दलवाणी (५७) यांचे शहापूर तालुक्यातील गांडुळवाड येथे फार्म हाऊस आहे. या फॉर्म हाऊसमध्ये आरोपीने प्रवेश करत नरेश यांची बहिण विना हरपलानी (७५) यांची हत्या केली. नंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, हातातील बांगड्यांची चोरी केली. तसेच, आरोपीने नरेश यांची ९७ वर्षांची आई लक्ष्मी दलवाणी यांच्यावर हत्याराने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचा हा प्रकार १८ ऑगस्टच्या रात्री ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडला होता. या प्रकरणी किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य पाहता ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, रोहन शेलार, दिपेश किणी यांचे पथक करत होते. या पथकाने परिसरात काम करणारे कामगार, स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याची उकल करत शिवाजी धसाडे (२७) याला ताब्यात घेत अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला किन्हवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शहापूर तालुक्यातील ढाकणे येथे राहणारा आरोपी शिवाजी याने डोळखांब येथे कपड्याचे दुकान उघडले होते. मात्र, तो कर्जबाजारी झाला होता. पुढे सण, उत्सव असल्याने त्याला दुकानात कपडे खरेदी करायचे होते. त्याकरीता चोरलेल्या दागिन्यांची आरोपीने तत्काळ विक्री केली. या विक्रीतून त्याला चार लाख रुपये मिळाले होते. हे पैसे त्याच्या बॅंक खात्यात जमा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक दिपेश किणी यांनी दिली.