अँटॉपहिल पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराज्य बतावणी टोळीला अटक, दोन गुन्हे उघडकीस
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – बतावणी करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अँटॉप हिल पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला असून आरोपींना पोलीस कोठडीत ठेवून पुढील तपास सुरू आहे. १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.४० वाजता सायन कोळीवाडा परिसरात जी.टी.बी. मोनोरेल स्थानकाजवळील मरिअम्मन मंदिराजवळ ही घटना घडली. फिर्यादी श्रीमती अफरीन अब्दुल हकिम शेख (वय ४७) पायी जात असताना दोन महिला आणि एका मुलाने पैशांचे बंडल देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील दागिने सुरक्षित ठेवण्यास सांगितले. विश्वासात घेऊन फिर्यादीने २१ ग्रॅम वजनाचे, अंदाजे ₹१,३६,८०० किमतीचे सोन्याचे दागिने पिशवीत ठेवले. मात्र, आरोपींनी ती पिशवी घेऊन पोबारा केला.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अँटॉपहिल पोलिसांनी तपास सुरू केला. तपासातून आरोपी दिल्लीतील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिस पथकाने दिल्लीच्या रघुबीरनगर भागात सापळा रचून ११ ऑगस्ट रोजी आरोपींना अटक केली आणि त्यांना मुंबईत आणले. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
अटक आरोपींची माहिती
१) प्रविनकुमार जगदीश यादव (३५), वाहनचालक, रघुबीरनगर, नवी दिल्ली.
२) श्रीमती मनी उर्फ निनी पवन बावरीया (३७), रघुबीरनगर, नवी दिल्ली.
१. श्रीमती मनी उर्फ निनी पवन बावरीया हिच्याविरुद्ध नॉर्थ अव्हेन्यू व हौज खास पोलीस ठाण्यात २०२१, २०२२ आणि २०२४ मध्ये कलम ४२०, ३४, ३२८ अंतर्गत गुन्हे नोंद आहेत.
२. अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई येथे गु.र.क्र. ५६६/२५, कलम ३१८(४), ३(५) भा.दं.वि. अंतर्गत दाखल असलेला आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त श्री. विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ४) श्रीमती रागसुधा आर, तसेच सहा. पोलीस आयुक्त (सायन विभाग) श्री. शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. व.पो.नि. शिवाजी पावडे, पो.नि. गोपाळ भोसले, स.पो.नि. शिवाजी मदने, म.पो. उप.नि. सरोजिनी इंगळे, पो.उप.नि. राहूल वाघ यांच्यासह पोलीस हवालदार व शिपाईंच्या पथकाने महत्वपूर्ण भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईमुळे बतावणीच्या गुन्ह्यांवर लगाम लागण्यास मदत होणार असून, मुंबई पोलिसांच्या दक्षतेचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.