मीरा-भाईंदरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद; ४ फूट पाणी साचल्याने पर्यायी मार्गाचा पर्याय

Spread the love

मीरा-भाईंदरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद; ४ फूट पाणी साचल्याने पर्यायी मार्गाचा पर्याय

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या घोडबंदर रोडवरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. विशेषतः, रस्ते आणि पूलांखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनांचा वेग कमालीचा मंदावला असून, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. कासारवडवली वाहतूक शाखेने नागरिकांना अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोडवरील काही मुख्य ठिकाणांवर पाण्याची पातळी वाढल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. यात प्रामुख्याने पातलीपाडा, मानपाडा ब्रिजखाली आणि चितळसर पोलीस स्टेशनसमोरील भाग, या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

याशिवाय, मीरा-भाईंदरकडे जाणाऱ्या मार्गावरही परिस्थिती गंभीर आहे. मीरा-भाईंदर हद्दीतील वर्सोवा, काजू पाडा आणि चेना गाव या ठिकाणी ४ फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. यामुळे घोडबंदर रोडवरून मीरा-भाईंदरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. पोलिसांनी या मार्गाचा वापर टाळण्यास सांगितले आहे, अन्यथा वाहनचालक मोठ्या वाहतूक कोंडीत अडकू शकतात. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. ठाण्याहून घोडबंदरकडे जाताना वाहनचालकांनी पोखरण रोड नंबर २, मागाठाणे रोड, ग्लॅंडिस अव्हेन्यूज रोड, आणि मुल्लाबाग या मार्गांचा वापर करावा. त्याचप्रमाणे, घोडबंदरहून ठाण्याकडे जाताना आनंदनगर, वाघबीळ, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड आणि कोलशेत या मार्गांचा वापर करणे सोयीचे ठरेल. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. घोडबंदर रोडचा वापर टाळावा. तसेच, कोणत्याही परिस्थितीत विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो आणि अपघाताची शक्यता वाढते. वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon