नाशिकमध्ये शिवसेना (शिंदे गट) बैठकीनंतर हाणामारी; पोलिसांची तारांबळ
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे नाशिक येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन गटांमध्ये सभागृहाबाहेर हाणामारी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा एक पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप झाल्याने वाद पेटला. या अचानक घडलेल्या गोंधळामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. सोमवारी हॉटेल एक्स्प्रेस इन येथे अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नेते, आमदार, खासदार, संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर जिल्ह्याची बैठक पार पडली. त्यानंतर सभागृहाबाहेर शहरप्रमुख सचिन जाधव आणि बाबू शेठ यांच्या गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. शिवीगाळीनंतर पोलिसांनी काहींना बाहेर नेले.
मात्र, वाहनतळात पोहोचल्यावर पुन्हा धक्काबुक्की आणि मारामारी झाली. काहींनी बैठकीत केलेल्या तक्रारीमुळे दुसऱ्या गटाने हल्ला चढविल्याची चर्चा सुरू आहे. एका गटाचा आरोप आहे की, त्यांच्या बैठकीत कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चा एक पदाधिकारी आल्याने त्याला बाहेर काढण्यात आले आणि त्यामुळे गोंधळ झाला. घटनेवर भाष्य करताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “बैठकीतील माहिती प्रसिद्धीसाठी बाहेर देणे चुकीचे आहे. संबंधितांना समज देण्यात आली आहे. पक्ष मोठा झाला असून, दुसऱ्या पक्षाचा कोणी बैठकीत घुसल्यास त्याला शोधून काढू. अहिल्यानगरचे नवीन आमदार चांगले काम करत आहेत. अकोल्यातील मेळाव्याची पक्षाने दखल घेतली आहे. काहींनी तो होऊ नये यासाठी प्रयत्न केले, ही बाब आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडू.” ही गोंधळाची घटना आणि पक्षातील अंतर्गत वादामुळे बैठकीच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.