लोन ॲपवरून लोन घेणे तरुणीला भोवले; अश्लील फोटो थेट घरच्यांना पाठवले

Spread the love

लोन ॲपवरून लोन घेणे तरुणीला भोवले; अश्लील फोटो थेट घरच्यांना पाठवले

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – जोगेश्वरी भागात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीसोबत ऑनलाइन फसवणूक आणि मानसिक छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने इंस्टाग्रामवर ‘कॅश लोन’ नावाच्या मोबाईल ॲपची जाहिरात पाहून कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र त्यानंतर तिची आर्थिक फसवणूकच झाली नाही, तर तिला बदनाम करण्याच्या धमक्याही मिळू लागल्या. या संपूर्ण प्रकरणामुळे ही तरुणी हादरून गेली आहे. जोगेश्वरी पश्चिममधील सुलतानाबाद चाळीतील क्रांती नगर परिसरात कुटुंबासह राहणाऱ्या पीडितेने इंस्टाग्रामवर “कॅश लोन” नावाच्या ॲपची जाहिरात पाहिली. तिला तातडीने पैशांची गरज असल्यामुळे तिने २० जुलै २०२५ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास हे ॲप डाउनलोड केले. पीडितेने ॲपवर तिची सर्व वैयक्तिक माहिती, आधार कार्ड आणि बँकेचे डिटेल्स शेअर केले. तिने कोटक महिंद्रा बँकेचे खाते नंबर देऊन २००० रुपयांचे कर्ज मागितले. त्यातून तिला फक्त १३०० रुपये ट्रान्सफर करण्यात आले. हे कर्ज सहा दिवसांसाठी होते.

कर्जाची मुदत संपण्याआधीच पीडितेला मोबाईलवरून धमक्यांचे मेसेज येऊ लागले. आरोपीने तिला सांगितले की, जर तिने लगेच पैसे परत केले नाहीत, तर तो तिचे अश्लील फोटो बनवून सोशल मीडियावर व्हायरल करेल. या भीतीपोटी पीडितेने ३१ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दोन टप्प्यांत प्रत्येकी १००० रुपये, असे एकूण २००० रुपये युपीआय द्वारे पाठवले. हे पैसे फोनपेवर ‘संदेश कुमार’ नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाले. त्याच दिवशी संध्याकाळी ७ च्या सुमारास पीडितेच्या मावशीने फोन करून सांगितले की, त्यांना व्हॉट्सॲपवर पीडितेच्या चेहऱ्याचे मॉर्फ केलेले एक नग्न छायाचित्र पाठवण्यात आले आहे. काही वेळातच पीडितेच्या आणखी दोन मित्रांनाही त्याच नंबरवरून हे फोटो पाठवण्यात आले. या मानसिक आघातानंतर पीडितेने आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला आणि ते पोलीस ठाण्यात पोहोचले.

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत पीडितेने स्पष्टपणे सांगितले आहे की, आरोपीने तिची प्रतिष्ठा खराब करण्याची धमकी दिली. जाणूनबुजून मॉर्फिंगद्वारे अश्लील फोटो तयार केले. शिवाय असे अश्लील फोटो तिच्या नातेवाईकांना आणि तिच्या मित्रांनाही पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिवाय आरोपींचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणात दोन हजाराचं कॅश कर्ज घेणं तरुणीलाच महागात पडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon