स्मार्ट मीटरने दिला वीज बील वाढीचा शॉक, भरमसाठ रकमेमुळे कल्याणकर हैराण
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण ग्रामीणमधील पलावा हाय प्रोफाईल सोसायटीमधील घरांना वीजेचा टीओडी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर जवळपास २५० पेक्षा जास्त वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत आहे.स्मार्ट मीटर या बिलामुळे पलावामधील वीज ग्राहक हैराण झाले आहेत. त्यापैकी काही वीज ग्राहकांच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही तांत्रिक समस्या आहे. लवकर ही समस्या दूर केली जाईल असे स्पष्ट केले आहे. पलावा सोसायटीत राहणारे सिद्धार्थ खरे यांनी सांगितले की, त्यांना स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी ४ ते ५ हजार रुपये वीज बिल येत होते. आता स्मार्ट मीटर बसविल्यावर अनाचक १६ हजार वीज बिल देण्यात आले आहे. हे वीज बील पाहून मी हवालदिल झालो आहे असं ते म्हणाले. तर दुसरे वीज ग्राहक अमित शुक्ला यांनी सांगितले की, त्यांना महिन्याभराचे विजेचे बील सहा हजार रुपये येत होते. आता स्मार्ट मीटर बसविल्यावर १० हजार ७५ रुपये बिल आले आहे. शुक्ला यांच्या प्रमाणेच बकुल भट्टाचार्य यांनी सांगितले की, त्यांना महिन्याभराचे बील ३ ते ४ हजार रुपये येत होते. स्मार्ट मीटर बसविल्यावर अनाचक बिलात वाढ झाली. तेच बिल ९ ते १९ हजाराच्या घरात येवू लागले.
त्यात कुणाला १३ हजार, १५ हजार आणि १९ हजार रुपये बिल ही आलं आहे. स्मार्ट मीटर हे अचूक रिडिंग घेण्यासाठी लावले गेले आहे. त्यामुळे त्यातून अचूनक बील येते असा वीज वितरण कंपनीचा दावा आहे. असे असले तर स्मार्ट मीटरचा फटका अचूक मीटर रिडिंग ऐवजी ग्राहकांच्या खिशाला बसत आहेत. अशा प्रकारचा स्मार्ट मिटर ग्राहकांच्या काय कामाचा असा संतप्त सवाल विज बिल ग्राहक विचारत आहेत. यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे कल्याण पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश बोडके यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कल्याण ग्रामीणमधील पलावा सोसायटीत स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत. काही वीज ग्राहकांचे मीटर रिडिंग झाले नसेल. त्यामुळे त्यांना जास्तीचे वीज बिल गेले आहे. त्यांच्या वीज बिलात दुरुस्ती केली जाईल. ही समस्या तांत्रिक स्वरुपाची आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की, ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत वीज वितरण कंपनीला योग्य ती सूचना करण्यात आली आहे. वाढीव बिलाच्या तक्रारींचे लवकरच निवारण केले जाणार आहे.