बीडमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून विनयभंग; हात-पाय बांधून शेतात फेकलं
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – बीडच्या शिरुर तालुक्यातील वडाळी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचं घराजवळून अपहरण करत तिचे हातपाय बांधून शेतात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर बाब म्हणजे गतवर्षी देखील दोन वेळा असाच प्रकार घडला होता. त्यावेळी देखील पालकांनी तक्रार केली होती. परंतु पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने तिसर्यांदा हा प्रकार घडला आहे. ही मुलगी घराच्या पाठीमागील बाजुस थांबलेली असतांना समोरुन आलेल्या दोघांनी तिच्या तोंडावर स्प्रे फवारला. यानंतर तिला गुंगी आल्यासारखं झालं होतं. त्यानंतर त्या दोघांनी तिला ओढत नेऊन जवळच्या शेतात बांधून टाकला. तसंच तिचा विनयभंग देखील करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
आता या प्रकरणात देखील दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किमान आता तरी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.