गहाळ मोबाईल शोध मोहीम: ठाणे पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी, तब्बल १०५ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – पोलीस आयुक्तालय ठाणे शहर, परिमंडळ ५ अंतर्गत येणाऱ्या वर्तकनगर विभागाने नागरिकांच्या तक्रारींना तांत्रिक दक्षतेने प्रतिसाद देत एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वर्तकनगर, कापुरबावडी, चितळसर आणि कासारवडवली या चार पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण १०५ गहाळ मोबाईल फोन शोधून मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले, ही नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरणारी कारवाई ठरली आहे. गेल्या काही महिन्यांत मोबाईल चोरी व गहाळ होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने, मा. सहायक पोलीस आयुक्त मंदार जावळे (वर्तकनगर विभाग) यांच्या नेतृत्वाखाली आणि सीईआयआर पोर्टलच्या सहाय्याने तांत्रिक विश्लेषणाद्वारे ही विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत विविध पोलीस ठाण्यांनी कामगिरी केली. त्यानुसार वर्तकनगर पोलीस स्टेशन – ३५ मोबाईल शोधून काढले, कापुरबावडी पोलीस स्टेशन – २० मोबाईल, चितळसर पोलीस स्टेशन – २५ मोबाईल व कासारवडवली पोलीस स्टेशन – २५ मोबाईल शोधून काढले. या मोबाईल फोनची एकूण अंदाजित किंमत सुमारे रु. ३१.५० लाख इतकी आहे. हे मोबाईल केवळ ठाणे किंवा मुंबईपुरते मर्यादित नसून, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, आसाम, तामिळनाडू आणि इतर राज्यांमधून ट्रेस करून पुनर्प्राप्त करण्यात आले.
या सर्व मोबाईल फोनचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे मूळ तक्रारदार नागरीकांना सुपूर्द करण्यात आले. या विशेष मोहिमेमध्ये पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ प्रशांत कदम व सहा. पोलीस आयुक्त (वर्तकनगर विभाग), मंदार जावळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीमध्ये वरील विभागीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनतीने सहभाग घेतला. पोलीस दलाच्या या जलद आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत कारवाईने नागरीकांच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास दृढ होत असून, ठाणे पोलिसांची कार्यक्षम व तत्पर सेवा याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.