कोळसेवाडी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; सीसीटीव्ही कैमऱ्यात चोरी दिसूनही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलिस स्थानकाचा अजब कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. सीसीटीव्हीत मोबाईल चोर स्पष्टपणे दिसूनही चोरीचा गुन्हा नोंदवण्याऐवजी पोलिसांनी मोबाईल हरवल्याची नोंद घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलीस कामकाजावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कल्याण पूर्वेतील गणेश मंदिर परिसरातील गणेश स्टील अँड नोवेल्टी या भांड्यांच्या दुकानात घडलेला मोबाईल चोरीचा प्रकार आणि त्यानंतर कोळसेवाडी पोलिस ठाण्याची भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सुरेखा पाठारे (३०) या दुकानमालक १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आपल्या दुकानात होत्या. त्याचवेळी एक इसम ग्राहक बनून भांडी घेण्यासाठी आला. त्याने विविध भांडी दाखवण्याची मागणी करत सुरेखा यांचे लक्ष विचलित केलं. आणि त्यांचं नीट लक्ष नाही हे पाहत, संधी साधून त्या भामट्याने दुकानात ठेवलेला मोबाईल फोन आपल्या उजव्या खिशात टाकून लंपास केला. काही वेळाने तो दुकानदाराच्या नकळत बाहेर निघून गेला.
थोड्याच वेळात सुरेखा यांना आपला मोबाईल सापडत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीचा प्रकार स्पष्ट दिसून आला, त्या इसमाने मोबाईल खिशात टाकल्याचे त्यात स्पष्टपणे दिसत होते. हे पाहिल्यावर सुरेखा या तातडीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेज घेऊन गेल्या आणि मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा स्पष्ट चोरीचा प्रकार असूनही पोलिसांनी केवळ “मोबाईल हरवला” अशी नोंद केली. या प्रकारामुळे आता कोळसेवाडी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दखलपात्र गुन्ह्यांची नोंद न घेता त्यांना ‘गहाळ’ म्हणून दाखवणे हा काही पोलिसांचा पद्धतशीर प्रकार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही पुराव्यानुसार तक्रारीची नोंद घेऊन संबंधित चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करावी , अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे.