मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्याचा प्रताप!
१८अधिकाऱ्यांची केली २ कोटी ६१ लाखांची फसवणूक; पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिव अधिकाऱ्याने मुंबईतील १८ राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची तब्बल २ कोटी ६१ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पवईच्या हिरानंदानी परिसरात ब्लू बेल इमारत येथील शासकीय कोट्यामधील निवासस्थाने नावावर करुन देतो, असे खोटे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. राजेश शालिग्राम गोवील असं मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिव अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिव अधिकारी राजेश शालिग्राम गोवीलने मुंबई येथील १८ राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची २ कोटी ६१ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. १९८६ ला हिरानंदानी बिल्डर, राज्य सरकार व एमएमआरडीए यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. त्यानुसार हिरानंदानी, पवई येथील काही जागा राज्य सरकारने हिरानंदानी बिल्डरला विकासासाठी दिली होती. त्याबदल्यात हिरानंदानी बिल्डर हे हिरानंदानी पवई येथील १२९६ सदनिका राज्य सरकारला देणार होते. याबाबत दाखल जनहित याचिका बाबत न्यायालयाने २०१२ साली निर्णय देताना हिरानंदानी बिल्डरने दिलेल्या सदनिका राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १३५ रुपये प्रति चौरस फूट दराने विक्री कराव्यात असे आदेश दिले होते.
नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी असलेले राजेश गोविल यांनी या १८ शासकीय कर्मचाऱ्यांना सदरच्या सदनिका नावावर करुन देतो, असे आमिष दाखवले. आपल्याला न्यायालयात लढावे लागेल व माझ्या ओळखीने हे सर्व प्रकरण मी करुन देतो म्हणून तब्बल अढीच कोटी रुपयांना कर्मचाऱ्यांना गंडवले आहे. या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये २०२१ पर्यंत टप्याटप्याने गोविल यास दिले आहेत. मात्र त्याने दिलेली मुदत संपूनही सदनिका नावावर झाल्या नाहीत तसेच गोविल याने पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार घडला. त्यामुळं फसवणूक झालेले अधिकारी सावध झाले. त्या सर्व फसवणूक झालेल्याअधिकाऱ्यांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.