मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चैन हिसकावणाऱ्या आरोपीला डोंबिवली पोलिसांनी केली अटक; ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चैन हिसकावणाऱ्या आरोपीला डोंबिवली पोलिसांनी केली अटक; ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क 

कल्याण-डोंबिवली परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावणाऱ्या आरोपीला डोंबिवली पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून डोंबिवली आणि कल्याण परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना उद्देशून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सदर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अँटी चेन स्नॅचिंग पेट्रोलिंग व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली होती.

पोलिस तपासानुसार, दिनांक २३ जून २०२५ रोजी सकाळी ७:३० वा. ९० फुट रोडवरील दावत हॉटेलसमोर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने हिसकावण्यात आली होती. तसेच ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ८:०० ते ८:४५ दरम्यान, ठाकुर्ली परिसरातील सौ. मंजू अनिल शहा (वय ६३) यांच्या गळ्यातील १,८०,००० रुपयांची २० ग्रॅम सोन्याची चैन दोन अनोळखी इसमांनी स्कूटरवरून येऊन हिसकावली होती. यासंदर्भात डोंबिवली पोलीस ठाण्यात गु.र.नं.५५१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हेगार दरवेळी मोटारसायकल बदलून गुन्हा करत असल्याने तपास अधिक कठीण बनला होता. मात्र, डोंबिवली पोलीसांच्या तपास पथकाने तब्बल १७२ सीसीटीव्ही फुटेज तपासून, तांत्रिक, नैसर्गिक आणि भौगोलिक तपासाच्या आधारे आरोपी परेश किशोर घावरी (वय ३५), रा. कल्याण पश्चिम याला अटक केली. चौकशीत त्याने एकूण ३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

त्याच्याकडून २० ग्रॅम सोन्याची चैन – रु. १,८०,०००/-, १० ग्रॅम सोन्याची चैन – रु

९०,०००/-, पल्सर मोटारसायकल (एमएच-०५/एफएस ९६५६) रु. १,१५,०००/-, यामाहा स्कुटर (एमएच -०५/एफवाय – १४७०) – रु. १,७०,०००/मुद्देमाल जप्त करण्यात आला.एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रू. ५,५५,०००/- आहे. या गुन्ह्याचा तपास डोंबिवली पोलीस ठाण्याचे तपास पथक करत आहे.

सदर कामगिरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जवादवाड, सपोनि बळवंत भराडे, पोउनि प्रसाद चव्हाण, पोउनि गोरखनाथ गाडेकर व त्यांच्यासह पोलिस कर्मचारी सुनिल भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड, नितीन सांगळे, निलेश पाटील, देविदास पोटे, राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर शिंदे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलीसांबद्दल विश्वास वाढला असून, डोंबिवली पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon