संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला; अंगावर काळे फासले, गाडी फोडली
पोलीस महानगर नेटवर्क
अक्कलकोट (सोलापूर) : पुरोगामी विचारांचे प्रतिनिधीत्व करणारे आणि राज्यभरातील युवकांमध्ये विचारप्रवर्तनासाठी व्याख्याने देणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हल्ला करण्यात आला. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे.
गायकवाड हे अक्कलकोट येथील फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यासाठी आले होते. कार्यक्रमस्थळी पोहोचताच काही कार्यकर्त्यांनी त्यांना अचानक गराडा घालून त्यांच्या अंगावर शाई टाकली आणि चेहऱ्यावर काळे फासले. त्यांच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच ते ज्या वाहनातून आले होते, त्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.
हल्लेखोर कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने गायकवाड यांना “संघटनेचे नाव बदलशील का?” असा सवाल करत कॉलरला पकडले. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता.