विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न फसला; कर्कटकचा वापर करून वाचवला जीव
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – भिवंडी शहरात घडलेली धक्कादायक घटना समोर आली असून, एका १६ वर्षीय विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मात्र, विद्यार्थिनीने वेळेवर प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला. तिने शाळेच्या दप्तरात ठेवलेला कर्कटक वापरून रिक्षा चालकावर हल्ला केला आणि शेजारी बसलेल्या प्रवाशाला झटका देत रिक्षातून उडी मारून पलायन केले.
पीडित मुलगी भिवंडीतील एका शाळेत इयत्ता १० वीमध्ये शिक्षण घेत असून, ती तिच्या कुटुंबासोबत शांतीनगर परिसरात वास्तव्यास आहे. शाळेत जाण्यासाठी घराजवळून रिक्षामधून निघालेल्या मुलीच्या रिक्षात काही अंतरानंतर एक अनोळखी प्रवासी चढला. शाळेजवळ पोहोचल्यावरही रिक्षा न थांबवल्याने तिने चालकाला थांबविण्याची विनंती केली. मात्र, चालक आणि त्या अनोळखी प्रवाशाने तिला गप्प बसण्यास धमकावले आणि रिक्षा चाविंद्र दिशेने भरधाव नेऊ लागले. विद्यार्थिनीने सूजबूज दाखवत आपल्या दप्तरातील कर्कटकचा वापर केला. तिने थेट रिक्षा चालकावर फवारणी केली आणि प्रवाशास ढकलून रिक्षामधून उडी मारली. त्यानंतर ती थेट शाळेत धावत गेली आणि नंतर घरी परतल्यावर संपूर्ण घटना पालकांना सांगितली. पालकांनी तत्काळ शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
११ जुलै रोजी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १३७ (२) (अपहरणाचा प्रयत्न) आणि कलम ६२ (सामूहिक सहभाग) अंतर्गत तपास सुरू केला आहे. आरोपी रिक्षा चालक व त्याच्या सहकाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे भिवंडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळकरी मुलामुलींसाठी सार्वजनिक वाहतूक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने यंत्रणेकडून कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.