माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मोठा दिलासा, सीबीआयनं सादर केला क्लोजर रिपोर्ट
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सिंह पोलीस आयुक्त होते. त्यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि खासगी व्यक्तींच्या विरोधात एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामधील दोन प्रकरणात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या गुन्ह्यामध्ये तपासानंतर फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासात कोणतेही तथ्य आढळले नाही, असे सांगत सीबीआयनं हा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात, तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह, इतर पोलीस अधिकारी आणि काही खाजगी व्यक्तींविरुद्ध एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी, एक गुन्हा ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदणी क्रमांक १७६/२०२१ अंतर्गत परमबीर सिंह, इतर पोलीस अधिकारी आणि अन्य ५ व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
दुसरा गुन्हा कल्याण येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदणी क्रमांक १०५/२०२१ अंतर्गत एकूण ३३ व्यक्तींविरुद्ध नोंदवण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो, नवी दिल्ली यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
या गुन्ह्यांच्या तपासाअंती, तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग नवी दिल्लीने कोपरी पोलीस स्टेशनमधील गुन्हा क्र. १७६/२०२१ च्या प्रकरणात १८/०१/२०२४ रोजी, तर बाजारपेठ पोलीस स्टेशन, कल्याण येथील गुन्हा क्र. १०५/२०२१ च्या प्रकरणात ११/०६/२०२५ रोजी माननीय न्यायालयात समाप्ती अहवाल सादर केला आहे.