बनावट मृत्युपत्रांद्वारे शासनाची फसवणूक; पाच जणांवर गुन्हा दाखल, १५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचीही चौकशी मागणी
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांतर्गत मृत बांधकाम कामगाराच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा गैरफायदा घेत, बनावट मृत्युपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासानुसार, मनोज रतनलाल अवस्थी, शोभा काशिनाथ वाघमारे, शैला सुरेश भांगे, सुनीता संजय कोळी आणि वैशाली नागनाथ जेऊरे या पाच जणांनी आपापल्या जोडीदाराच्या बनावट मृत्युपत्रांच्या आधारे आर्थिक मदतीसाठी अर्ज केले. त्यातील तिघांना रक्कम मिळाल्यानंतर यातील बनावटपणा समोर आला आणि प्रकरणाचा तपास सुरू झाला.
सदर फसवणूक एजंटांच्या माध्यमातून केल्याचा पोलिसांना संशय असून, मागील वर्षभरात बांधकाम कामगारांच्या नोंदणीत झालेली अचानक वाढ देखील संशयास्पद असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. एजंट काही रक्कम घेऊन कामगारांची नोंदणी करून त्यांना शासकीय लाभ मिळवून देत असल्याची प्रथा निर्माण झाली आहे. या पाचही व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अर्ज केले असून, त्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात सुमारे १५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विकास आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी सोलापूर जिल्हाध्यक्ष बशीर अहमद यांनी केली आहे. अहमद यांनी पुढे सांगितले की, माध्यान्ह भोजन योजना, जनआरोग्य योजना, तपासणी ते उपचार योजना, गृह उपयोगी वस्तूंचे संच, माहिती पुस्तिका वितरण, सुरक्षा संच या योजना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडल्या आहेत. त्यामुळे तातडीने स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून सखोल तपास न झाल्यास, सोलापुरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.