बनावट नवरी मुलीसह सात जणांची टोळी जेरबंद; सहा ते सात अविवाहित तरुणांची केली फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
नारायणगाव – सहा ते सात अविवाहित तरुणांशी लग्न करून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करून पसार झालेल्या आठ जणांच्या टोळीतील बनावट नवरीसह सात जणांना नारायणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून जेरबंद केले आहे. अटक आरोपी पैकी चार जणांना न्यायालयीन कोठडी तर तीन जणांना पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपीकडून पचवीस हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एक महिला आरोपी फरार आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील यानी दिली. या प्रकरणी टोळीतील बनावट नवरी अश्विनी साग जगदाळे (वय-३५, राहणार १६५/ पी, पर्वती दर्शन, स्वारगेट, पुणे) तसेच बनावट नातेवाईक सुवर्णमाला सुरेश वाडकर (रा. छत्रपती संभाजी नगर), संतोष सखाराम घोडे (रा. पिंपळनेर, पावर हाऊ जवळ, जालना रोड, ता. देऊळगाव, जि. बुलढाणा), भारती दामोदर मोरे (रा. डोणगाव, इंदिरानगर, ता. मेहकर, जि. बुलढाणा), सुनील काळे, पंकज डग (दोघेही रा × र पंचतळे, ता. शिरूर), नामदेव कोल्हे (रा, जांबुत, ता. पारनेर, जि. छत्रपती संभाजी नगर) यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी पैकी सुनील काळे, पंकज डग, नामदेव कोल्हे यांना पोलीस कोठडी दिली आहे. इतर अटक आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून, त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. बनावट नवरी अश्विनी जगदाळे हिला १६ वर्षाची एक मुलगी व १४ वर्षाचा एक मुलगा आहे. टोळीतील आरोपींनी मध्यस्थी करून खोडद येथील शरद गायकवाड याच्याकडून पैसे घेऊन अश्विनी हीच्यासोबत विवाह लावून दिला. त्यानंतर ती फरार झाली. या प्रकरणी शरद गायकवाड यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानंतर नारायणगाव पोलिसांनी तपास करून बुलढाणा येथून सात आरोपींना अटक केली. तपासात या टोळीने याच प्रकारे मध्यस्थी करून जुन्नर, पारनेर, शिरूर या तालुक्यातील सहा ते सात अविवाहित तरुणांशी अश्विनी हिचा विवाह लावून अविवाहित तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा दाखल आहे. अजूनही या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील हे करत आहेत.