अमेरिकन डॉलर्सचे आमिष दाखवून फसवणूक; सराईत टोळीला गुन्हे शाखेकडून बेड्या
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : अमेरिकन डॉलर्स स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत टोळीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय असून, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रईस अहमद अब्दुल जब्बार सय्यद, अबिदूर रेहमान मोहुउद्दीन शहा, अफजलअली रिसायतअली सय्यद आणि आदिल साहिल खान अशी आहेत. मानखुर्द येथील टी-जंक्शन परिसरातील एका लॉजमध्ये ही टोळी बनावट डॉलर व्यवहार करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून चारही आरोपींना ताब्यात घेतले. छाप्यावेळी पोलिसांनी नोटांच्या आकाराचे ४२ बंडल, चार रासायनिक द्रव्याचे कॅन, एक बाटली, विविध कंपन्यांचे सहा वापरते मोबाइल फोन, तसेच ३०,६०० रुपयांची रोकड असा एकूण १.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
फसवणुकीची शक्कल
या टोळीचा फसवणुकीचा प्रकार अत्यंत चलाखीने रचलेला होता. आरोपी खऱ्या डॉलर्सच्या नोटांवर काळा रंग लावत. त्यानंतर त्या नोटा विशिष्ट रसायनात बुडवून ग्राहकासमोर ‘रिअल डॉलर्स’ असल्याचा आभास निर्माण करत. या प्रकारे त्यांनी खऱ्या नोटांचा दाखला देत उर्वरित बंडलमध्येही डॉलर असल्याचे भासवले. प्रत्यक्षात ग्राहकास अशा काळ्या कागदाच्या बंडल दिल्या जात आणि आरोपी पैसे घेऊन पसार होत. गुन्हे शाखेच्या तपासात या टोळीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर परिसरातही अशाच प्रकारे नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, ही टोळी अनेक वर्षांपासून सक्रिय असून यापूर्वीही त्यांनी अशा पद्धतीने अनेकांना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात सर्व तक्रारी अजून पुढे आलेल्या नसल्या तरी आरोपींनी फसवणूक केलेल्या अनेक व्यक्तींनी संकोचामुळे तक्रार नोंदवलेली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेनंतर आणखी काही गुन्ह्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष-६ चे अधिकारी करत असून, आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.