पोटच्या ४० दिवसांच्या मुलीची तब्बल साडेतीन लाखात विक्री; रक्कम न मिळाल्याने स्वतःच पोलिसांकडे तक्रार. येरवडा पोलिसांकडून बाळ विक्री प्रकरणात सहा जणांना अटक

Spread the love

पोटच्या ४० दिवसांच्या मुलीची तब्बल साडेतीन लाखात विक्री; रक्कम न मिळाल्याने स्वतःच पोलिसांकडे तक्रार. येरवडा पोलिसांकडून बाळ विक्री प्रकरणात सहा जणांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक गुन्हेगारी घटना वाढल्याचं दिसून येत असताना येरवडा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या ४० दिवसांच्या मुलीची तब्बल साडेतीन लाखात विक्री केली, पण अपेक्षेप्रमाणे रक्कम न मिळाल्याने स्वतःच पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अखेर सर्वच जणांना तुरुंगात धाडण्यात आलं! येरवडा पोलिसांनी या बाळ विक्री प्रकरणात सहा जणांना अटक केली असून,भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), १४३(३), १४३(४), ३(४) सह बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना २ जुलै रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान घडली होती. गुन्हा ४ जुलैला येरवडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. आरोपींमध्ये बाळाची आई मिनल ओंकार सपकाळ (३०), वडील ओंकार औदुंबर सपकाळ (२९), एजंट साहिल अफजल बागवान (२७), रेश्मा शंकर पानसरे (३४), सचिन रामा अवताडे (४४) आणि ग्राहक महिला दीपाली विकास फटांगरे (३२) यांचा समावेश आहे. अवघ्या दीड महिन्याच्या नवजात बाळाचा ३.५० लाखांसाठी सौदा केल्याचा प्रकार घडलाय. आर्थिक विवंचनेतून बाळाच्या आई वडिलांनी बाळाची एका एजंटला विक्री केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आई वडील व एजंट आणि बाळ खरेदी करणाऱ्या एकूण ६ जणांना अटक केलीय. मुंबईत एका उच्चभ्रू वस्तीत नवजात बाळाला सोडून इंग्रजीत चिठ्ठी लिहित आर्थिक विवंचनेतून सोडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुण्यातील येरवडा भागातून ही घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडालीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळ दांपत्याला दीड महिन्यापूर्वी मुलगी झाली होती. घरात आर्थिक चणचण असल्याने त्यांनी मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. एजंटच्या माध्यमातून दीपाली फटांगरे या महिलेला कोणतीही कायदेशीर दत्तक प्रक्रिया न करता ही मुलगी साडेतीन लाख रुपयांमध्ये विकली गेली. या व्यवहारात एजंटने दीड लाख रुपयांचं कमिशन स्वतःकडे ठेवून आई-वडिलांना फक्त दोन लाख रुपये दिले. काही दिवसांनी आई-वडिलांना खरी रक्कम कळताच त्यांना आपलीच फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीवरून संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आणि बाल विक्रीच्या या धक्कादायक व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon