कॉम्प्युटर क्लासेस चालकाकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग; रबाळे पोलिसांनी ३६ वर्षीय आरोपीला केली अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबई एरोलीत एका संगणक प्रशिक्षण केंद्राच्या मालकानेच आपल्या महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी ३६ वर्षीय आरोपीला शनिवारी अटक केली आहे. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आरोपीच्या संगणक क्लासमध्ये विद्यार्थ्यांना बेसिक संगणक प्रशिक्षण देण्याचे काम करत होती. तिच्या तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात ४ जुलै रोजी भारतीय न्याय संहिता च्या कलम ७४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला किंवा जबरदस्तीने स्पर्श करणे) व ७५ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नवी मुंबई रबाळे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “४ जुलै रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास क्लासमध्येच आरोपीने पीडितेला अश्लीलपणे स्पर्श केला, तिचे पाठीवर आणि नितंबावर मारले, तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या गालावर चुंबन घेतले आणि तिला अपमानित केले. तक्रारीनुसार, या प्रकारामुळे पीडिता मानसिकदृष्ट्या खचली असून तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.” सध्या नवी मुंबई रबाळे पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकारामुळे स्थानिक भागात संतापाचे वातावरण असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या वृत्ताचा उद्देश महिला सुरक्षिततेविषयी जागरुकता निर्माण करणे आहे. अशा प्रकारचे लैंगिक शोषण सहन न करता त्वरित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.