५ जुलैच्या मेळाव्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा दणका; जमावबंदीचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल

Spread the love

५ जुलैच्या मेळाव्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा दणका; जमावबंदीचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल

योगेश पांडे – वार्ताहर 

मुंबई – राज्यात हिंदींच्या सक्तीवरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदी भाषा असू नये अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांची होती. याविरोधात मनसेकडून मोठं आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली. आज या विरोधात भव्य मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. मात्र त्यापूर्वीच सरकारनं त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर मागे घेतले. त्यामुळे आता हा मोर्चा देखील रद्द करण्यात आला आहे. मात्र आता या मोर्चाऐवजी मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्ध ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित असणार आहेत. मात्र या मेळाव्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा दणका बसला आहे. गेल्या रविवारी मुंबईमध्ये हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली होती. या आंदोलनामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील सहभागी झाले होते. परंतु कोणतीही पूर्व परवानगी न घेता तसेच पोलीस आयुक्तांच्या जमाबंदी आदेशाचं उल्लंघन करून हे आंदोलन करण्यात आल्यानं , आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीचे दीपक पवार तसेच ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे, शाखाप्रमुख संतोष घरत विभाग संघटिका युगेंद्रा साळेकर यांच्यासह २५० ते ३०० जणांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२), १९०, २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे मेळाव्याच्या आधीच आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी गेल्या रविवारी आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनात हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली. मात्र कोणतीही परवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आल्याचा आरोप आहे, या प्रकरणात आता शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत २५० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon