“जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत वसुली नाही; अन्यथा वसुली करणाऱ्यांना उलटं टांगू” — बच्चू कडू यांचा सरकारला इशारा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिल आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. “७/१२ कोरा करा, कर्जमाफी द्या, अन्यथा वसुली करणाऱ्यांना उलटं टांगू,” अशा शब्दांत बच्चू कडूंनी आज मुंबईत आंदोलनादरम्यान सरकारला इशारा दिला.
कर्जमाफीच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन –
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिल आणि कर्जमाफीसाठी जूनमध्ये मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत आश्वासन दिल्यानंतर कडूंनी उपोषण स्थगित केलं. शासनाने समिती स्थापन करून निर्णय घेण्याचं वचन दिलं होतं, मात्र अद्याप निर्णय होत नसल्याने कडूंनी ७ जुलैपासून पदयात्रेचा इशारा दिला आहे.
३ जुलै रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक –
कर्जमाफीच्या मागणीवर ३ जुलैला मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी आणि आंदोलक प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीचा अभाव लक्षात घेता बच्चू कडूंचा संताप उफाळून आला आहे.
शेतकरी आत्महत्यांमुळे चिंता वाढली –
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. १ मार्च ते ३१ मे २०२५ या कालावधीत तब्बल ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने अधिकृतपणे जाहीर केली आहे. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांमध्ये विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेतकऱ्यांची संख्या अधिक असून, लातूर, यवतमाळ, अकोला, बीड, नांदेड आणि अमरावती हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित आहेत.
कारणे आणि उपाययोजना –
आर्थिक अडचणी, नापिकी, कर्जाचा बोजा, विमा भरपाई न मिळणं, वीजबिल वसुलीचा तगादा ही आत्महत्येची मुख्य कारणं असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नवीन मदत योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं असून, आत्महत्यांची कारणमीमांसा करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.
विरोधकांचा सरकारवर आरोप –
विरोधी पक्षांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निष्क्रिय असल्याचा आरोप केला आहे. “फक्त आश्वासनं नाहीत, कृती हवी”, अशी मागणी करत त्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.