गावठी दारुच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा; अंबरनाथमधून एकजण अटकेत, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथ परिसरातील जय गोलोबा चाळ समोर व्दारली पाडा येथील मोकळ्या मैदानावर बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या गावठी दारू तयार करण्याच्या हातभट्टीवर ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत आदेश गायकर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३,१५,९५० रुपये किंमतीचा गावठी दारू आणि संबंधित साहित्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आदेश पंडित हा अंबरनाथमध्ये अवैध गावठी दारू तयार करत असल्याची गोपनीय माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर जय गोलोबा चाळसमोरील मोकळ्या मैदानात पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत गावठी दारू तयार करण्याचे साहित्य, दारूच्या बाटल्या व तयार दारू जप्त करण्यात आली. त्यानंतर आदेश गायकर याला तातडीने अटक करून त्याच्याविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अप. पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे (शोध-१), प्रभारी अधिकारी विनायक घोरपडे (शोध-२) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. या कारवाईत सपोनि सुनिल तारमळे, सपोनि कृष्णा गोरे, सपोपि भुषण कापडणीस, पोउपनिरीक्षक सुहास तावडे, संदीप भोसले, तसेच पोहवा ठाकूर, पाटील, शिंदे, गायकवाड, जाधव, गडगे, राठोड, कानडे, पावसकर, कांबरी, इत्यादी पोलिस कर्मचारी सहभागी होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, परिसरातील इतर अशा बेकायदेशीर हातभट्ट्यांवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.