डिवाईन पॉवर फॉरेक्स फसवणूक प्रकरणी मुख्य सूत्रधार अजय उसारे अखेर गजाआड; सायबर पोलीसांची मोठी कारवाई

Spread the love

डिवाईन पॉवर फॉरेक्स फसवणूक प्रकरणी मुख्य सूत्रधार अजय उसारे अखेर गजाआड; सायबर पोलीसांची मोठी कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – नागरिकांना गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत डिवाईन पॉवर फॉरेक्स ट्रेडिंग या संस्थेच्या माध्यमातून तब्बल ७ कोटींपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधार अजय उसारे याला सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्तराखंडमधील डेहराडून येथून ताब्यात घेतले असून, त्याला १३ जून २०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. सन २०२२ मध्ये वागळे इस्टेट, ठाणे येथील ओरियाना बिझनेस पार्कमध्ये कार्यालय सुरू करून, ‘डिवाईन पॉवर’ या संस्थेच्या नावाखाली नागरिकांना १५ महिन्यांसाठी दरमहा १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यात आली. फिर्यादीसह ९१ साक्षीदारांनी सुमारे रु. ७.१४ कोटींची गुंतवणूक केली असून, ही संपूर्ण रक्कम फसवली गेली.

याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४२/२०२२ नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड विधान कलम ४२०, ४०६, ४०९, ३४, १२० (ब) तसेच महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाणे मार्फत करण्यात येत आहे. अजय उसारे हा गुन्हा घडल्यानंतर दुबई, नेपाळ अशा परदेशी ठिकाणी लपून राहत होता. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास पथकाने त्याचा डेहराडून, उत्तराखंड येथे शोध लावून ताब्यात घेतले. या यशस्वी कारवाईत मपोनि प्रियांका शेळके, सपोनि प्रदीप सरफरे, चेतन पाटील, पोलिस नाईक धिरज गायकवाड, प्रविण आव्हाड यांच्या समवेत संपूर्ण पथकाने अतिशय कौशल्याने तपास केला. आरोपी अजय उसारे यास २६ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणात ५ आरोपींना अटक झाली असून, आतापर्यंत सुमारे रुपये ८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा/सायबर) श्री. पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय पाबळे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा तपास मपोनि प्रियांका शेळके करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon