ठाण्यात क्रिप्टोकरन्सीमार्फत फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – सध्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, नागरिकांना डिजीटल अरेस्टची धमकी देऊन लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे सायबर पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात आरोपींनी बनावट सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादीकडून तब्बल ३.०४ कोटी रुपये उकळले.
गुन्ह्याचा प्रकार:
ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ७७६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ आणि आयटी अॅक्ट २००० अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी यांना डीएचएल कंपनीच्या बनावट पार्सलच्या प्रकरणात अडकवून, अमली पदार्थ असल्याची बतावणी करत त्यांच्यावर डिजीटल अरेस्टची धमकी देण्यात आली. व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे आरोपींनी स्वत:ला सीबीआय अधिकारी सांगून, खात्यातील पैसे “तपासणीसाठी” दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
रक्कम कशी वळवली?
फिर्यादीकडून मिळवलेली रक्कम आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळवून, त्यातील ८२.४६ लाख रुपये क्रिप्टोकरन्सी (यूएसडीटी) च्या माध्यमातून परदेशात ट्रान्सफर केल्याचे उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. किशोर बन्सीलाल जैन (वय ६३) – सत्कार पतपेढी चेअरमन
२. महेश पवन कोठारी (वय ३६) – गारमेंट व इमीटेशन ज्वेलरी व्यवसाय
३. धवल संतोष भालेराव (वय २६) – कॉस्मेटिक व्यवसायिक
सदर तिघांना १९ जून २०२५ रोजी सायं. ७:५० वाजता अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलीस कोठडीत रवानगी देण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाणे, ठाणे शहर येथील पथक करत असून, कार्यवाही पोलीस उपआयुक्त (आर्थिक गुन्हे) श्री. पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय पाबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके, आणि पोनि. सुदेश आजगांवकर, प्रियंका शेळके, सपोनि. मंगलसिंग चव्हाण, प्रदीप सरफरे, चेतन पाटील, तसेच पोलीस शिपाई पातळीवरील अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
ही यशस्वी कारवाई सायबर गुन्ह्यांवर रोख लावण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही अधिकृत माहिती किंवा समन्स आल्यास पोलिसांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.