सराफांनी कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक; ३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Spread the love

सराफांनी कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक; ३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे – सोने घेऊन पळ काढणाऱ्या कारागिराच्या घटना नेहमी ऐकिवात येतात, मात्र यावेळी उलट प्रकार घडला आहे. स्वतःचे सोने वापरून कारागिराने तयार केलेले ११३३ ग्रॅमचे दागिने सराफांनी घेऊन टाकले; तसेच २७ लाखांचे सोने परत न करता त्याची फसवणूक केली. या प्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात अमर पाचू माजी (वय ५२, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून राजाराम मोरे, मनोज मोरे (रा. आंगणवाडी, मोरे सव्ती, चिखली), आणि विकास इंगळे (रा. तपकीर गल्ली, बुधवार पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ८ ऑगस्ट २०२४ पासून सुरू असून अद्याप सोन्याची परतफेड न झाल्यामुळे आता कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

फिर्यादी माजी हे “अमर माजी गोल्ड स्मिथ” या नावाने बुधवार पेठेत दागिने बनविण्याचा व्यवसाय करतात. ते विविध सराफ व्यावसायिकांच्या ऑर्डरप्रमाणे दागिने तयार करतात. आरोपी विकास इंगळे हा त्यांचा जुना ओळखीचा असून तो १६ जुलै २०२४ रोजी राजाराम व मनोज मोरे यांना दुकानात घेऊन आला. “पूजा ज्वेलर्स” नावाने व्यवसाय करीत असल्याचे सांगत त्यांनी जवळपास ३ किलो सोन्याच्या भांडवलाचा दावा केला. त्यांनी ६७६ ग्रॅम फाईन सोने माजी यांच्याकडे दिले आणि आवश्यक असल्यास स्वतःचे सोने टाकून दागिने बनविण्याची परवानगी दिली. माजी यांनी ११३३ ग्रॅमचे दागिने तयार केले. त्यात पेंडल, मंगळसूत्र वाटी, कानचैन, अंगठ्या अशा प्रकारांचा समावेश होता.

८ ऑगस्ट रोजी तिघांनी दुकानात येऊन दागिने घेतले आणि लवकरच २७.६२ लाखांचे ४०६ ग्रॅम सोने परत करतो असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर अनेक वेळा मागणी करूनही त्यांनी सोने परत केले नाही. त्यामुळे शेवटी माजी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon