मुंबईत माणुसकीला काळीमा! नातवाने आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले; गोरेगाव येथील धक्कादायक घटना
मुंबई – “आईनंतर जी व्यक्ती सर्वाधिक आपली असते, ती आजी…” या भावनेला काळीमा फासणारी घटना मुंबईत समोर आली आहे. गोरेगाव परिसरात ६० वर्षीय यशोदा गायकवाड या वृद्ध महिलेला स्वतःच्या नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या वृद्धेला त्वचेचा कॅन्सर असून त्यांच्यावर उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याने नातवाने त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी हे अमानवी कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. यशोदा गायकवाड यांना मुंबईतील आरे कॉलनीजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकण्यात आले होते. आजूबाजूच्या नागरिकांनी कचऱ्यात एका महिलेला असहाय्य अवस्थेत पाहिल्यावर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून यशोदा गायकवाड यांची सुटका केली आणि त्यांना कूपर रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
नातवाचे कृत्य, पोलीस तपास सुरू
यशोदा गायकवाड या आपल्या नातवांसोबत मालाड परिसरात राहायच्या, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीस दिलेल्या पत्त्यावर पोहोचले असता घराला कुलूप आढळले, त्यामुळे नातू आणि कुटुंबीय सध्या फरार असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस त्यांच्या शोधात असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
समाजमन हलवणारी घटना
ही घटना केवळ कायद्याचा नाही, तर माणुसकीच्या मर्यादांचा मुद्दा बनली आहे. ज्यांनी आपलं बालपण मायेने फुलवलं, त्या आजीला नातवाने अक्षरशः रस्त्यावर फेकण्याची ही कृती समाजाला अंतर्मुख करणारी आहे.