उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला; संतप्त नवऱ्याचा सासू, सासरे आणि पत्नीच्या भावावर थेट प्राणघातक हल्ला
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळाला. लग्न झाल्यानंतर केवळ काही दिवसांतच वादामुळे पत्नी माहेरी गेली. जाताना घरातील भांडीकुंडी अन् सगळंच घेऊन गेली. सामान परत आणण्यासाठी नवरा थेट १०-१२ जणांना घेऊन पत्नीच्या माहेरी पोहोचला. संतप्त नवऱ्याने सासू, सासरे आणि पत्नीच्या भावावर लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी थेट प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील भरतनगर परिसरात घडली. समाधान बाविस्कर असं आरोपी जावयाचं नाव आहे. समाधानने २० मे रोजी चिदानंद गावडे यांच्या मुलीशी लग्न केलं होतं. हे त्या मुलीचं दुसरं लग्न होतं. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच नवरा-बायकोमध्ये सतत वाद सुरू झाले. वाद विकोपाला गेल्यामुळे चिदानंद गावडे यांची मुलगी माहेरी परत आली. माहेरी येताना तिने तिच्या वैवाहिक आयुष्यातील खरेदी केलेल्या संसारोपयोगी वस्तू देखील सोबत आणल्या. यामुळे समाधान बाविस्कर नाराज झाला आणि त्याने त्या वस्तू मागण्यासाठी १० ते १२ जणांसोबत गावडे कुटुंबाच्या घराकडे गेला.
वस्तू परत देण्यास नकार देण्यात आल्यानंतर संतप्त झालेल्या समाधानने त्याच्या साथीदारांसोबत रेखा गावडे (सासू), चिदानंद गावडे (सासरे) आणि करण गावडे (पत्नीचा भाऊ) यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.आरोपी जावई समाधान आणि त्याच्यासोबत आलेल्या इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.