मुंबईत महिला पायलटचा कॅबमधून प्रवास करताना विनयभंग; चालकासह दोघांविरोधात गुन्हा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – घाटकोपरमध्ये एका खासगी कॅब प्रवासादरम्यान एका महिला पायलटवर विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तक्रारदार महिला एक नामांकित एअरलाइन्समध्ये पायलट असून, त्यांच्या फिर्यादीवरून घाटकोपर पोलिसांनी कॅब चालकासह दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
घटना कशी घडली?
१९ जून रोजी रात्री १०.४५ च्या सुमारास पीडित महिला फोर्ट येथून घाटकोपरला जाण्यासाठी कॅबने निघाल्या होत्या. अंदाजे २५ मिनिटांच्या प्रवासानंतर चालकाने वाटेत गाडी थांबवून दोन अनोळखी तरुणांना गाडीत बसवले. या दोघांनी महिलेच्या शरीराला अश्लीलरित्या स्पर्श केला तसेच दमदाटी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालक मात्र गप्प राहून वाहन चालवत होता.
पोलिसांची कारवाई:
पीडित महिलेने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघा आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, महिलेकडून नोंदवण्यात आलेल्या जबाबात काही विसंगती आढळून आल्या असून त्याचा तपास सुरू आहे.
घटनास्थळ अज्ञात:
महिला मुंबईत नवीन असल्यामुळे घटना नक्की कुठे घडली हे सांगता आले नाही. मात्र, पोलिस नाकाबंदी दिसताच दोघे आरोपी पळून गेले आणि चालकाने महिलेला तिच्या घरी सोडले.