दारू महागली ! देशी ८०, महाराष्ट्र मेड १४८, प्रीमियम विदेशी दारू ३६० रुपयांना

Spread the love

दारू महागली ! देशी ८०, महाराष्ट्र मेड १४८, प्रीमियम विदेशी दारू ३६० रुपयांना

राज्य शासनाने उत्पादन शुल्क वाढवले; मद्यप्रेमींच्या खिशाला झळ, सरकारच्या तिजोरीत १४,००० कोटींची भर

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई – राज्यातील मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची आणि आर्थिकदृष्ट्या झळ देणारी बातमी समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत देशी व विदेशी मद्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादन शुल्क वाढवून सरकारने महसुलात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आता १८० मिली दारूसाठी ८० ते ३६० रुपये मोजावे लागणार आहेत.

कोणत्या प्रकारच्या दारूचे दर किती?

प्रकार नवीन किरकोळ दर (१८० मि.ली.)

देशी दारू ८० रुपये

महाराष्ट्र मेड लिकर (एमएमएल) १४८ रुपये

भारतीय बनावटीची विदेशी दारू (आयएमएफएल) २०५ रुपये

प्रीमियम विदेशी ब्रँड ३६० रुपये

महसुलात १४,००० कोटींची वाढ

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आयएमएफएल वर १.५% करवाढ केली असून, विदेशी मद्यावरही कर वाढवण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे १४,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे.

विभागात १२२३ नवीन पदांची भरती

राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक सक्षम करण्यासाठी १२२३ पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरासाठी नवीन विभागीय कार्यालय असतील तर ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर येथे नवीन अधीक्षक कार्यालये असतील

एआय आधारित कंट्रोल रूम तयार होणार असून उत्पादन व विक्रीवर नजर ठेवण्यात येणार आहे.

हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये सीलबंद दारू विक्रीस परवानगी

राज्य सरकारने हॉटेल्स व रेस्टॉरंट्समध्ये सीलबंद विदेशी मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. यावर १० ते १५% अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.

स्वस्त होणाऱ्या ब्रिटिश बिअरमधून दिलासा?

भारत-ब्रिटन एफटीए करारामुळे देशात विकली जाणारी ब्रिटिश बिअर ७५% पर्यंत स्वस्त होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर झाले होते. पण महाराष्ट्रात करवाढ झाल्याने मद्यप्रेमींसाठी ही स्वस्त बिअरही फारसा दिलासा देणारी ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon