खून का बदला खून! सांगलीत ‘चित्रपटासारखा’ थरार; वडिलांच्या खुनाचा बदला घेत मुलाचा खून, आरोपी अटकेत
योगेश पांडे / वार्ताहर
सांगली – “खून का बदला खून” ही सिनेमात अनेकदा पाहिलेली कहाणी सांगली शहरात प्रत्यक्ष घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने त्याच आरोपीचा खून केला आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. घटना थोडक्यात अशी की, २०२१ साली महेश कांबळे याने फिरोज शेख याचा पैशाच्या वादातून खून केला होता. या प्रकरणी महेशला अटक झाली होती, मात्र २०२३ मध्ये तो जामिनावर सुटला. त्यानंतर तो शहरात कोथिंबीर विक्रीचा व्यवसाय करू लागला.
महेश कांबळे पुन्हा मोकळा फिरत असल्याची माहिती फिरोज शेख यांचा मुलगा मुजाहिद शेख याला मिळाल्यावर त्याच्या मनात राग आणि सुडाची भावना पेटली. त्यातच महेश कांबळेचे एका नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे कळल्यामुळे मुजाहिद आणखीनच संतप्त झाला. खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने साथीदारासह कट रचला. गुरुवारी सकाळी, महेश कांबळे कोथिंबीर खरेदी करून गाडीने शंभरफुटी रस्त्याने जात असताना तो लघुशंकेस थांबला, आणि याच क्षणी मुजाहिद व त्याच्या साथीदाराने त्याच्यावर हल्ला चढवला. महेश गंभीर जखमी झाला आणि थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास महेश कांबळेचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला. पोलिसांनी त्वरीत तपास करून मुजाहिद शेख आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. चौकशीदरम्यान मुजाहिदने वडिलांच्या खुनाचा बदला घेतल्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे सांगली शहरात भीतीचे आणि थरारक वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.