मुंबईही असुरक्षित? तलवारी-कुऱ्हाडींचा कहर! घरात घुसून वृद्ध महिलेसह चौघांवर हल्ला
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – सुरक्षित समजल्या मुंबईत रात्रीच्या सुमारास काही गुंडानी धुमाकूळ घातला. तलवारी, कुऱ्हाडीसह गुंडांनी एका कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे. गुंडांनी परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. एका जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. माटुंगा परिसरात शनिवारी रात्री उशिरा भीषण गुन्हेगारी घटना घडली. तलवारी आणि कुऱ्हाडीने सुसज्ज असलेल्या गुंडांच्या टोळक्याने सार्वजनिक ठिकाणी थेट हल्ला चढवला. यामध्ये काही पुरुष आणि महिलांना गंभीर दुखापत झाली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फूटेजनुसार काही गुंड मोठ्या निर्धास्तपणे हातात तलवारी, लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडी घेऊन फिरत असल्याचे दिसून आले. यावेळी एका घरावर त्यांनी हल्ला केला असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. त्याशिवाय, एका ठिकाणी गुंडांनी सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. गुंडाच्या मारहाणीत जखमी झालेल्या एका वृद्धेसह चौघांना रुग्णालयात उपचारासाठी लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित कुटुंबाचा आणि गुंडांचा २३ मे रोजी एक वाद झाला होता. या वादाचा राग मनात ठेवत हल्ला झाला. गुंडांनी हल्ला केल्यानंतर पीडितांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करत हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. मात्र, गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे. दिलीप जंगली, देवा जंगली, फिलीप, वसीमलाला, प्रसाद सपकाळ, राजू जंगली, अँथनी जंगली आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.