कोकाकोला कंपनीविरोधातील मूक मोर्च्यावर गुन्हा दाखल; ४५० ग्रामस्थांवर कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
रत्नागिरी – खेड तालुक्यातील असगणी येथे हिंदुस्तान कोकाकोला कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांनी काढलेल्या मूक मोर्च्याचे चिघळले प्रकरण आता कायदेशीर वळणावर गेले आहे. स्थानिक बेरोजगारांना रोजगार न मिळाल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ५ जून रोजी तोंडाला काळी पट्टी बांधून शांततेत मोर्चा काढला होता. मात्र या मोर्च्यादरम्यान मनाई आदेशाचा भंग करण्यात आल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी तब्बल ४५० ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच संजना संजय बुरटे, उपसरपंच यासिन फरीक घारे यांचाही समावेश आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोकाकोला कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा, तसेच उपसरपंच व इतरांवर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा निषेध म्हणून हा मोर्चा शांततेत काढण्यात आला होता.
पोलिसांनी कलम १४४ अंतर्गत लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याचे सांगत ही कारवाई केली आहे. मात्र ग्रामस्थांनी प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केला आहे की, शांततेत व निवेदनात्मक पद्धतीने आंदोलन केल्यासुद्धा अशा प्रकारे गुन्हे दाखल करणे लोकशाहीला मारक आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट असून, पुढील काही दिवसांत ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात संवाद व समन्वय आवश्यक ठरणार आहे.