पुण्यातील नीलकंठ ज्वेलर्सला सेल्समनने घातला तब्बल साढे चार कोटिंचा गंडा; पोलसांनी आरोपी सेल्समनच्या आवळल्या मुसक्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – सेल्समनने सोन्याची चोरी करुन सराफी पेढीला तब्बल ४ कोटी ५८ लाख रुपयांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्समधील सेल्समनचा हा प्रताप आहे. विश्रामबाग पोलिसांनी सेल्समनला अटक केली आहे. दोन महिन्यात सेल्समनने सराफी दुकानातील अंगठी, कॉइन, वेडणी असे तब्बल ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ रुपयांचे सोने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत नितीन इरप्पा डांगे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी प्रतिक नगरकर याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक हा नीलकंठ ज्वेलर्स या सराफी दुकानात कामाला होता. त्याच्याकडे सराफी पेढी मधील अंगठी, कॉइन व वेडणी या काउंटरची जबाबदारी होती. दररोज, तो तिथल्या दागिन्यांचे लेबल काढून ठेऊन तिथेच ठेवत होता. विक्री झालेल्या वस्तू व शिल्लक वस्तू यांची नोंद ठेवताना तो चोरुन नेलेल्या वस्तूंचा शिल्लक वस्तूमध्ये दाखवत होता यामुळे दुकानात हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. मात्र, २६ मे रोजी स्टॉक तपासणी करताना नितीन डांगे यांना संशय आला. त्यांनी सर्व स्टॉक मोजून पाहिला तर त्यात तब्बल ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ किमतीच्या वस्तू गायब असल्याचे समोर आलं. पोलिसांनी आता प्रतीक नगरकर याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.
शहरातील नारायण पेठ परिसरातील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या सराफ पेढीत तब्बल ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही चोरी पेढीतच सेल्समन म्हणून कार्यरत असलेल्या प्रतीक नगरकर (३५) याने केल्याचे तपासात उघड झाले असून, त्याच्याविरुद्ध अपहार आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पेढीचे व्यवस्थापक नितीन इरप्पा डांगे (३७ ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी नगरकर हा पत्र्या मारुती चौकाजवळील नीलकंठ ज्वेलर्समध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करत होता. त्याच्याकडे अंगठी, सुवर्ण नाणी, वेढणी अशा विविध मौल्यवान दागिन्यांच्या विक्रीचे आणि साठवणीचे काम सोपवण्यात आले होते. मात्र, १ एप्रिल ते २६ मे २०२५ या कालावधीत त्याने गुपचूपपणे एकामागोमाग एक अशा प्रकारे साडेचार कोटी रुपयांचे दागिन्यांचे अपहार केले. ही बाब व्यवस्थापनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील सराफ व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.