मामाच्या मुलावर प्रेम पण कुटुंबाचा विरोध; १६ वर्षाच्या मुलीने थेट घराच्या छताला गळफास घेत केली आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – डोंबिवली शहरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची एक घटना समोर आली आहे. आत्महत्येचं कारण एकूण अनेकांना धक्का बसला आहे. मुलीचं मामाच्या मुलावर प्रेम होतं आणि या प्रेमाला कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे मुलीने हे भयानक पाऊल उचललं आहे. ही घटना मंगळवारी घडली असून, पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, ही घटना मंगळवारी डोंबिवली परिसरातील खंबाळपाडामध्ये घडली. अधिकाऱ्यानं सांगितले की, मुलीने तिच्या कुटुंबाला सांगितलं होतं की, ती तिच्या मामाच्या २५ वर्षीय मुलावर प्रेम करते. मामाचा मुलगा ठाण्यामध्ये राहत असल्याची माहिती आहे. या मुलावर तिचं प्रेम होतं, मात्र कुटुंबाचा या नात्याला विरोध होता.
पोलिसांनी सांगितलं की, कुटुंबाने मुलीला हे नातं संपवण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाने समजावून सांगितल्यानंतरही काही उपयोग झाला नाही. मंगळवारी दुपारी मुलीने तिच्या घराच्या छतावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील लोकांना ही घटना कळताच त्यांनी मुलीला जवळच्या रुग्णालयात नेलं. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी मात्र तिला मृत घोषित केलं. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.