धक्कादायक ! पुण्यात दिवंगत पोलीस अधिकाऱ्याच्या लेकीवर होणाऱ्या नवऱ्याकडून अत्याचार व तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – गेल्या काही दिवसांपासून शहरात वारंवार अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच आता पुण्यातील दिवंगत पोलीस अधिकाऱ्यांच्या लेकीवर होणाऱ्या नवऱ्याकडूनच अत्याचार करत १६ लाख रुपयाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसात सेवा करूनही मुलीची तक्रार नोंदवण्यासाठी तब्बल २१ दिवस वाट पहावी लागल्याची तक्रार पिडीतेच्या आईने केली आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता पुण्यातील मांजरीची रहिवासी असून ती ब्युटी पार्लर चालवते. तिने तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर २०२० मध्ये ती लोणी काळभोर येथील एका जिममध्ये काम करत होती. आरोपी श्यामनाथ गंभीरे (वय २५) हा त्या जिममध्ये ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट होता. पीडिता तिथे एक महिना काम करून सोडून गेली. जून २०२१ मध्ये पीडितेच्या आईला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला. म्हणून, पीडिता आरोपी गंभीरेकडे गेली आणि तिच्या आईसाठी डाएट प्लॅन देण्याची विनंती केली. यानंतर गंभीरे पीडितेच्या घरी येऊ लागला. तो तिच्या वडिलांसोबत बसून गप्पा मारत असे. या दरम्यान, गंभीरे आणि पीडिता यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याने तिच्यावर अत्याचार करत तिची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक केली.