बीडमध्ये तरुणाचे अपहरण; झाडाला बांधून मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, ७ जणांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि मारहाणीच्या घटनांचे व्हायरल होणारे व्हिडिओ चर्चेचा आणि गंभीर विषय बनला आहे. बीड पोलीस प्रशासनानेही व्हायरल व्हिडिओची दखल घेत कारवाई केली आहे. मात्र, अद्यापही बीड जिल्ह्यातील अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. केज तालुक्यात तरुणाचे अपहरण करत झाडाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र, मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनैतिक संबंधाचे कारणातून ही मारहाण झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ७ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील भाटूंबा येथे अनैतिक संबंधातून अण्णा उर्फ ज्ञानेश्वर धपाटे यांचे अपहरण करत झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर धपाटे याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे.